जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी बांधवाचा पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांना वेग आला असुन लवकरच पुर्व हंगामी कपाशी लागवड आणि खरिप हंगामाला सुरुवात होईल त्यासाठी प्रशासनाने जाहिर केल्यानुसार 15 मे पासुन बियाणे विक्रीला सुरुवात होणार आहे. परंतु शेतकऱ्यांची लगबग आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बोगस बियाणे खते विक्री करणाऱ्या कंपन्या सक्रिय होतात. मागिल खरिप हंगामात जिल्हयात बोगस बियाणे खतांमुळे शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक मानसिक नुकसान झाले होते. म्हणुन येत्या खरिप हंगामात बोगस बियाणे खते विक्रीला आळा घालून शेतकरी बांधवाना दर्जेदार बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे.
बोगस खते बियाणे विक्री आणि उत्पादित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. बियाणे खते खरेदीत शेतकरी बांधवांची फसवणूक होऊ नये यासाठी जनजागृती करावी. शेतकऱ्यांना मागील हंगामातील मंजुर असलेल्या पिक विम्याचा लाभ मिळवून दयावा. तसेच बोदवड तालुक्यात असलेल्या तीव्र पाणीटंचाई वर तात्काळ उपयोजना करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी रोहिणीताई खडसे म्हणाल्या
शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शेतकऱ्यांच्या कुटुबांचा आर्थिक आधार हा खरीप हंगामावर अवलंबून असतो. त्यामुळे शेतकरी बांधव खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. लवकरच खरिप हंगामाला सुरूवात होत आहे तसेच जिल्हयात अनेक ठिकाणी मे महिन्या अखेर पुर्व हंगामी बागायती कपाशीची लागवड केली जाते त्यासाठी लागणारे कपाशीचे बियाणे व खरिपाच्या लागवडीसाठीच्या बियाणे खरेदीची शेतकरी बांधवांची लवकरच लगबग सुरू होईल.
शेतकऱ्यांना पेरणीसाठी दरवर्षी लाखो रुपयांची बि बियाणे खते किटकनाशके कृषी केंद्रातून विकत घ्यावे लागतात. परंतु शेतकरी बांधवांची लगबग त्यांचे अज्ञान या बाबी हेरून बोगस बी-बियाणे खते विक्री करणाऱ्या कंपन्या सक्रिय होतात. व बोगस बियाणे खते विक्री करून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असतात. बोगस बियाणे पेरले कि त्यांची उगवण क्षमता नसते त्यामुळे पिक उगवत नाहीत. त्याची तक्रार करायला कालावधी लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना संबंधित कंपनी कडून भरपाई मिळत नाही. तसेच शेतात पिक सुद्धा उगवत नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उशिरा दुबार पेरणी करावी लागते त्याचा उत्पादनावर परिणाम होतो त्यामुळे शेतकरी बांधवांना मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
खते बोगस निघाल्यास ते खत टाकलेल्या पिकांची वाढ खुंटते अथवा पिके करपून जातात. तसेच बोगस खत टाकलेल्या जमिनीच्या उगवण क्षमतेवर परिणाम होऊन जमिनीचे पोत खराब होते. त्यामुळे दुबार पेरणी केली तरीही पिक येत नाही. दोन ते तिन वर्षासाठी शेतजमीनीच्या उगवण शक्तीवर परिणाम होतो. मागिल वर्षी जिल्हयात काही ठिकाणी बोगस बियाणे आणि बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यात बोगस खत विक्री झाल्याचे आढळून आले होते. या बोगस खतांमुळे पिकांची वाढ खुंटून पिके करपल्याने शेतकरी बांधवांचे मागील खरीप हंगामात मोठे आर्थिक ,मानसिक नुकसान झाले होते संबंधित कंपनीची वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रार करून सुद्धा अद्यापही संबंधित कंपनीवर ठोस कारवाई झालेली नाही. तसेच संबंधित कंपनी कडून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. बोगस खतांमुळे बाधित झालेल्या शेतजमिनीवर रब्बीच्या हंगामात सुद्धा पिकांच्या उगवण क्षमतेवर आणि उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. बाधित जमिनीवर येत्या खरिप हंगामात सुद्धा पिक उगवणार कि नाही म्हणून सबंधित शेतकरी बांधव चिंतेत आहेत. त्यामुळे बोगस बि-बियाणे, खते, किटकनाशके विक्री करणाऱ्या कंपन्या एकप्रकारे शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे काम करत असल्याचे दिसुन येत आहे. येत्या खरिप हंगामात बोगस बि बियाणे खते विक्री होऊ नये व शेतकरी बांधवाना उच्च उगवण क्षमता असणारे दर्जेदार बी-बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करून संबंधित कृषी व इतर विभागांना योग्य ते निर्देश देऊन बोगस बि बियाणे खते विक्रीला आळा बसुन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जास्तीत जास्त बियाणे गुण नियंत्रण कक्षाची स्थापना करावी. व कृषी विभागाकडून संबंधित बि बियाणे खतांची तपासणी, प्रमाणीकरण झाल्याशिवाय संबंधित कंपनीला उत्पादने विक्रीची परवानगी देऊ नये. तसेच तपासणीसाठी जास्तीत जास्त भरारी पथकांची नियुक्ती करून बोगस बि बियाणे, खते व कीटकनाशके यांची विनापरवाना विक्री, जादा दराने विक्री किंवा काळाबाजार होऊ नये याची काळजी घ्यावी, अशी विक्री करताना विक्रेता आढळल्यास त्या विक्रेत्यावर कारवाई करावी व सबंधित बोगस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून ती कंपनी कोणतेच उत्पादन महाराष्ट्र किंवा इतर राज्यात विक्री करू शकणार नाही, असे निर्बंध लावावे व त्या कंपनीचा परवाना कायम स्वरूपी निलंबित करावा.
तसेच शेतकरी बांधवांची फसवणूक होऊ नये यासाठी बियाणे खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी,खबरदारी विषयी शेतकरी बांधवां मध्ये जाहिराती,बातम्या व इतर माध्यमातून योग्य ती जनजागृती करावी बोगस बियाण्यांची खतांची विक्री होत असल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास तक्रार करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी. तसेच खरिप हंगामा साठी बि बियाणे खतांचा तुटवडा निर्माण होऊ न देता गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके रास्त भावात शेतकरी बांधवाना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे
मागील हंगामातील पिक विमा मंजुर होऊनही काही तांत्रिक बाबीमुळे बहुतांशी शेतकरी बांधवांना अद्याप पिक विम्याचा लाभ मिळालेला नाही. तरी पिक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करून तत्काळ शेतकरी बांधवांना पिक विम्याचा लाभ देण्यात यावा. तसेच बोदवड तालुक्यात तिव्र पाणीटंचाई असुन नागरिकांचे, गुरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. पाणी टंचाईवर करण्यात येणाऱ्या विहीर अधिग्रहण,विहीर खोलीकरण, टँकर द्वारे पाणीपुरवठा अशा उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तरी पाणी टंचाई वर करण्यात येणाऱ्या विहीर अधिग्रहण, खोलीकरण,तात्पुरती पाईपलाईन, टँकर द्वारे पाणीपुरवठा अशा उपायोजना लवकरात लवकर करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केल्याचे रोहिणीताई खडसे यांनी सांगितले. तसेच शेतकरी बांधवानी सुद्धा बियाणे खरेदी करताना घाई करू नये. अधिकृत कृषी निविष्ठा केंद्रातूनच खते व बियाणे खरेदी करावीत. बियाणे ,खते पाकिट सिलबंद मोहोरबंद असल्याची खात्री करावी.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत तपासून घ्यावी. बियांण्याची रिकामे पाकिट, खतांची पिशवी हंगाम संपेपर्यंत जपुन ठेवावी. बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे,खतांच्या खरेदीचा संपुर्ण तपशील असलेली बिले घ्यावी व ती जपून ठेवावी असे रोहिणी खडसे यांनी शेतकरी बांधवाना आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनिल माळी,अजय बढे,हितेश जावळे,चेतन पवार आदि उपस्थित होते.