जामनेर (प्रतिनिधी) बारावीत प्रथम आलेल्या आपल्या मुलाचे शैक्षणिक यश पाहण्यापूर्वीच अपघातात भारुडखेडा येथील वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आनंदा भीमराव जगताप (रा. भारुडखेडा ता. जामनेर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी आनंदा जगताप यांच्या मुलाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात मुलगा गणेश हा शाळेतून पहिला आला.
जामनेर तालुक्यातील भारुडखेडा येथे आनंदा जगताप हे कुटुंबासह वास्तव्यास होते. बुधवारी आनंदा जगताप हे त्यांचे मित्र दिपक शेळके यांच्यासोबत मॅजिक या चारचाकीने कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. काम आटोपून घराकडे परतत असतांना रात्री अडीच वाजेच्या सुमारास जामनेर ते वाकडी रस्त्यावर अपघातमध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते प्रवास करत असलेले वाहन रात्री झाडावर धडकले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक दीपक मुरलीधर शेळके हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, २५ मे रोजी बारावीचा निकाल लागला. त्याच वेळी भारुडखेड्यात अपघातात मृत झालेल्या अनिल जगताप यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. त्यामुळे शाळेत पहिला येवूनही गणेश हा निकाल घेण्यासाठी आला नव्हता.
दरम्यान, गणेश हा राणीदानजी जैन माध्यमिक, कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. गणेश हा विद्यार्थी ८३.५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला. परंतु त्याचे हे यश पाहण्यापूर्वीच त्याचे वडील अनिल जगताप यांचा बुधवारी रात्री जामनेरजवळ झालेल्या अपघातात निधन झाले. मुलाने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक करण्यासाठी ही त्याचे वडील हयात नसल्याने या घटनेमुळे शाळेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
















