बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या बातम्यांवर पत्रकार संघटनेतर्फे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूक आणि सध्या सुरू असलेली विधानसभा निवडणूक या कालावधीत असे लक्षात आले आहे की, फक्त बोदवड तालुक्यातील पत्रकारांबाबत सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते आवश्यक तो मानसन्मान देण्यास तयार नाहीत. कोणत्याही बातम्या स्थानिक पत्रकारांना डावलून वरिष्ठ पातळीवरून प्रसिद्ध करण्याचे प्रयत्न केले जातात. स्वतःच्या पक्षांच्या कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीबाबत कोणतीही प्रेस नोट किंवा माहिती पत्रकारांना दिली जात नाही. त्यावरून असे लक्षात येते की, राजकीय नेते व पदाधिकारी यांना बोदवड तालुक्यातील पत्रकारांशी संबंध ठेवण्यास इच्छा नाही. त्यामुळे राजकीय नेते व पदाधिकारी यांचा पत्रकारांशी संवाद नसल्याने आजपासून त्यांच्या बातम्यांवर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि पत्रकारांच्या माध्यमातून सुरू असलेला हा बहिष्कार निवडणुकीनंतर असाच कायम राहणार असल्याचे सर्वानुमते पत्रकारांनी ठरवलेले आहे.