मुंबई (वृत्तसंस्था) वर्षा बंगल्यावर शिवसेना (Shivsena) प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. भाजप आणि विरोधकांवर तुटून पडा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या आहेत. शिवसेनेची काम जनतेपर्यंत पोहोचवा, असं देखील ते म्हणाले.
या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला सडेतोड उत्तरं देण्याचा आदेश दिला आहे. बैठकीत बाबरी मशिद, तसेच अन्य मुद्द्यांवर चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. ‘बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते. मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेंचे काय सुरु होतं. भाजपवर तुटुन पडा सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या. यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा, अशी चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. तसेच बैठकीत शिवसंपर्क अभियान आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली आहे.
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा घेवून राज्य सरकारला इशारा दिला आहे. मनसेने पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे अध्यक्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी खासदारांची आणि शिवसेना प्रवक्त्यांची बैठक घेतली आहे.
या बैठकीला राज्यातील शिवसेनेचे खासदार उपस्थित झाले आहे. तसेच प्रवक्तेही उपस्थिकत झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. अगोदर सेनेच्या प्रवक्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर खासदारांची बैठक होणार आहे.