यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सावदा येथील एका पतसंस्थेचा अवसायकास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच लाखांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. सखाराम कडू ठाकरे (वय- 56 वर्ष रा. 11, राधेय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पाचोरा), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
सखाराम कडू ठाकरे यांचे पद विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, (प्रक्रिया, धुळे) असे आहे. तसेच त्यांच्याकडे भूविकास बँकेच्या विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्थेचा अति. कार्यभारही आहे. त्याचपद्धतीने सावदा येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेडचा अवसायक म्हणून कार्यभारही ठाकरे यांच्याकडेच आहे. दरम्यान, नगर परिषद सावदा जि. जळगाव येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम तक्रारदार यांच्या नावे वर्ग करून देण्यासाठी यातील अवसायक सखाराम ठाकरे यांनी यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 5,00,000/- (पाच लाख) रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक !
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि हेमंत बेंडाळे, पोनि रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे यांनी कारवाई केली.