जम्मू (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi visit Jammu) आज जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ते जम्मूमधील सांबा येथे सभेला संबोधित करणार आहेत. मोदींच्या सभेच्या ठिकाणाहून १२ किमी अंतरावर ललियाना (Laliyana) गावात एका शेतामध्ये स्फोट झाला आहे.
जम्मू शहराच्या बाहेरील सुंजवान येथे दहशतवादी चकमक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा नवीन सुरक्षा आढावा घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली अधिक सुरक्षित करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. ही रॅली बहुस्तरीय सुरक्षा घेराखाली काढण्यात येणार आहे. गुप्तचर यंत्रणेचा आणखी विस्तार करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सीमेत ड्रोन घुसण्याची शक्यता नाहीशी करण्यासाठीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रॅलीत एक लाख लोक सहभागी व्हावेत यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात येत आहे.
रॅलीच्या सुरक्षेशी संबंधित अधिकार्यांनी सांगितलं की, सांबा आणि आसपासच्या परिसरात पूर्ण सुरक्षेअंतर्गत बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमाचे ठिकाण सध्या सामान्य लोकांसाठी मर्यादित आहे. कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चौक्या वाढवण्यात आल्या आहेत. महामार्ग आणि त्याच्या लगतच्या रस्त्यांवरील वाहने आणि लोकांना कसून तपासणी केल्यानंतरच पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे.
पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा
जम्मूतील सांबा जिल्ह्यात होणाऱ्या पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं असून राजकीय अर्थही काढले जात आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत बोलताना ते प्रथम ग्रामसभेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यादरम्यान देशभरातील ग्रामसभांच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. पंतप्रधान हजारो पंचायतींच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहे. त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशातील सर्व पंचायतींचाही गौरव करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.