नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हिंडनबर्ग अहवालामुळं (Hindenburg Report ) अडचणीत आलेल्या उद्योगपती गौतम अदानी (Businessman Gautam Adani ) यांच्या मागे लागलेलं अडचणी कमी होतांना दिसत नाहीय. कारण हिमाचल प्रदेशात सुरु असणाऱ्या सिमेंट वादामध्ये आता अदानींच्या काही कारखाने, कंपन्यांवर धाडसत्र सुरु झालं आहे.
बुधवारीच स्टेट एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटकडून हिमाचलमधील (Himachal Pradesh) अदानी विल्मर ग्रुपवर (Adani Wilmar Group) धाड टाकण्यात आली आहे. अदानी समूहाच्या (Adani Group) एकूण सात कंपन्या हिमाचल प्रदेशात कार्यरत आहेत. या कंपन्या राज्यात फळे साठवण्यासाठी शीतगृह साखळी सुविधा उपलब्ध करून देतात. याशिवाय किराणा मालाच्या पुरवठ्यातही त्याचा मोठा वाटा आहे. राज्यातील नागरी पुरवठा आणि पोलीस विभागातील वस्तूंचा पुरवठा अदानी ग्रुपच्या माध्यमातून केला जातो.
24 जानेवारी रोजी अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने एक अहवाल जारी करून अदानी समूहावर फसवणुकीचा आरोप केला होता. यानंतर हिंडेनबर्ग अहवालाच्या आधारे काँग्रेस पक्षाने यापूर्वीच अदानी समूहावर हल्ला चढवला आहे. काँग्रेसने या प्रकरणी संसदेत जेपीसीची मागणी केली आहे. फ्रान्सच्या टोटल एनर्जीज या ऊर्जा क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने अदाणी समूहाबरोबर केलेली भागीदारी स्थगित केली आहे. अदाणींच्या तब्बल ५० अब्ज डॉलर्सच्या हायड्रोजन प्रकल्पात ही कंपनी सर्वांत मोठी परदेश गुंतवणूक आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांबाबत स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय प्रकल्प पुढे जाणार नसल्याचे टोटल एनर्जीजने जाहीर केले आहे.