जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरने त्याच्यावरील आरोपांवरील काही मुद्यांवर पोलिसांना होकारार्थी उत्तरं दिल्याचे कळते. दरम्यान, यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुरज झंवर हा मागील ११ दिवसापासून पुणे आर्थिक शाखेच्या पथकाच्या कोठडीत होता. यावेळी सुरजने महत्वपूर्ण आरोपांवर पोलिसांना होकारार्थी उत्तरं दिली असल्याची माहिती समोर येत आहे. सुरजने त्याच्या कार्यालयातून बीएचआरच्या अनेक कर्ज फाईली, राजपत्रित अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तसेच बेनामी मालमत्ते कागदपत्र कार्यालयात सापडल्याच्या प्रश्नावर होकारार्थी उत्तरं दिली असल्याचे कळते. सुरजच्या या होकार्थी उत्तरांमुळे पोलिसांच्या तपासाला मोठी दिशा मिळाली आहे. सुरजने सॉफ्टवेअरमध्ये फेरफार केल्याचेही मान्य केल्याचे कळते. याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी सूत्रांनी माहिती दिल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सूरजच्या कार्यालयात एका आमदाराच्या लेटरपॅडसह बीएचआरच्या कर्जाच्या फाईली सापडल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, हे लेटरपॅड नेमक्या कोणत्या आमदाराचे आहे, याबाबत जळगाव शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणी पुण्यातील विषेश न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सुनावणी सुरू आहेत. आरोपींकडून अॅड. उमेश रघुवंशी हे तर सरकारपक्षाकडून अॅड. प्रवीण चव्हाण हे कामकाज बघत आहेत.