बीड (वृत्तसंस्था) धारूर तालुक्यातील चोरांबा येथील एका दिराने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून आयुष्यभरासाठी वहिनीला आधार दिलाय. केवळ विवाहच नाही तर पुतण्याची देखील त्याने जबाबदारी स्विकारुन तो पितृछत्र हरपलेल्या चिमुकल्याचा बाप झाला आहे.
धारूर तालुक्यातील चोरांबा येथील पत्रकार दिगंबर शिराळे यांचे लग्नानंतर वर्षभरातच अपघाती निधन झाले होते. या घटनेमुळे शिराळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दिगंबर शिराळे यांचे अपघातात निधन झाल्यानंतर, त्यांच्या पत्नी रेणुका शिराळे एकट्या पडल्या होत्या, तसेच त्यांचा दीड महिन्याचा चिमुकलाही वडिलांच्या मायेला पोरका झाला होता. कमी वयात विधवा झालेल्या वहिनीचे आणि चिमुकल्याचं दु:ख हनुमंतला बघवले जात नव्हते. त्यामुळे त्याने वहिनीसोबत लग्नगाठ बांधून तिला व तिच्या मुलांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचा निर्णय घेतला.
गावातील ज्येष्ठ नागरिक व नातेवाईक मंडळींनी पुढाकार घेऊन रेणुका यांचा अविवाहित दीर हनुमंत याच्यासोबत लग्नासाठी पुढाकार घेतला. दोघांनीही विवाहाला संमती दिल्यानंतर त्यांचा विवाह मंगळवार (दि.३०) रोजी लावून देण्यात आला. यावेळी मुलामुलींचे मामा, मामी, आई-वडील, नातेवाईक यांच्यासह दादासाहेब चव्हाण, दत्ता फिटर, सरपंच, उपसरपंच राहुल चव्हाण, प्रभाकर फुटाणे, दत्ता इरमले, प्रकाश चव्हाण, बप्पा चव्हाण व गावकरी उपस्थित होते. या आदर्श विवाहाचे आणि दीर हनुमंतचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, याबाबतचे वृत्त आज दैनिक ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे.












