कोल्हापूर (वृत्तसंस्था) चंदगड येथील पोलीस पाटलाचा कोयता व खुरप्याने डोकीत व मानेवर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संदीप ज्ञानदेव पाटील (वय ४१, रा. पोवाचीवाडी, ता. चंदगड), असे मयत पोलीस पाटलाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. २४) रात्री आठ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मध्यस्थीसाठी बोलावून केला घात !
शनिवारी रात्री संशयित आरोपी रोहित निवृत्ती पाटील याच्याशी आपले भांडण सुरू असून, त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करत पोलीस पाटील संदीप यांना मध्यस्थीसाठी बोलावून घेतले होते. त्यानुसार पोलीस पाटील संदीप हे गुरव यांच्या देवाची रांगी नावाच्या शेतात रोहित पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, अरुण राजाराम व योगेश अरुण पाटील यांना समजावण्यासाठी गेले. परंतू जुन्या वादात पोलीस तक्रारीत नाव घातल्याचा मनात राग धरून त्यांनी संगनमत करून संदीप पाटील यांच्या हातावर, डोकीत व मानेवर कोयता व खुरप्याने सपासप वार करून खून केला. या प्रकरणी संदीपचे वडील ज्ञानदेव पाटील यांनी चंदगड पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तक्रारीत नाव घातल्याच्या संशयाने चौघांचे कृत्य !
संशयित रोहित व शांताराम आप्पा गावडा (रा. देवकांडगाव, ता. आजरा) या नातलगात मार्च महिन्यात भांडण झाले होते. यामध्ये रोहित व भावकीतील काही जणांच्या विरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये पोलीस पाटील संदीप यांनीच आपले नाव तक्रारीमध्ये घातल्याचा राग रोहितला होता. त्यातूनच हे कृत्य घडल्याचे बोलले जात होते. दरम्यान, मयत संदीप पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. रविवारी शवविच्छेदनानंतर संदीपच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला.