भुसावळ (प्रतिनिधी) शहरात मध्यरात्री एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दिलीप रामलाल जोनवाल (53, रा.महात्मा फुले नगर), असे मयताचे नाव आहे. त्यांचा डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण खून करण्यात आला.
शहरातील गवळीवाडा भागातील दोन संशयित आरोपींसोबत दिलीप जोनवाल यांचे जुने वाद होते व त्या वादातून मंगळवारी रात्री 1.30 वाजता गरूड प्लॉट भागात जोनवाल यांच्या डोक्यावर संशयितांनी लोखंडी पाईपाने वार करीत त्यांची हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाले आहेत. दरम्यान, जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनही परीचीत होते. हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. खून कुणी आणि कोणत्या वादातून केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीय.
पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला. गत महिन्यात कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची त्याची शालकाने कौटुंबिक वादातून हत्या केली होती तर कंडारी येथे जुन्या वादातून तिघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बाजारपेठ हद्दीत जीम ट्रेनरची उधारीच्या पैशांच्या वादातून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटकही करण्यात आली आहे.