जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील ते रेल्वे ट्रॅक दरम्यान असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर दोन तासात शहर पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात घेतले आहे. रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) असे मयताचे नाव आहे. मयताच्या धारदार सुऱ्याने खून करण्यात आल्याची प्रथम माहिती समोर आली आहे.
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारा रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. बुधवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह जळकी मीलजवळ असलेल्या गटारीत आढळून आला. रमाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकला लागूनच असलेल्या गटारीत पडलेला होता. तर जवळच रक्त आणि काही दगड पडलेले होते. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे घटनास्थळी पथकासह पोहचले होते. दरम्यान, रहीम शहा याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून दुपारी त्याला तीन तरुणसोबत घेऊन गेले होते, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिल्याचे कळते. पोलिसांनी तपासचक्र फिरवत खान्देश सेंट्रल परिसरातून तिघांना ताब्यात घेतले आहे. विलास, पवन अशी संशयितांची नावे आहेत. वारंवार शिवीगाळ करीत असल्याने आणि आर्थिक विषयामुळे खून केल्याची माहिती तिघांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.