नागपूर (वृत्तसंस्था) धावत्या रेल्वेवर डोके आपटून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साल्फियाबाद वस्तीतून जाणाऱ्या दिल्ली – नागपूर रेल्वे लाइनवर तीन महिन्यांपूर्वी ३० जुलै २०२३ रोजी घडली होती. तपासादरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे
पोलिसाचा मुखबिर असल्याचा आरोप करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एक लाखाच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण केले. तरुणाने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याचे डोके धावत्या रेल्वेवर आपटून निर्घृणपणे खून करण्यात आला. दरम्यान, कोराडी हद्दीतील साल्फियाबाद वस्तीमागील दिल्ली-नागपूर रेल्वेमार्गावर अपघात झाल्याने शेख अशपाक वल्द शेख मुश्ताक (२२, रा. नाझीर कॉलनी, बोखारा रोड, नागपूर) आणि असलम खान वल्द जमशेद खान (३४, रा. काळे ले-आउट, ओमनगर, नागपूर) हे दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी शेख अशपाक याला तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी जखमी असलम खान याने मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दिलेल्या बयाणावरून कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. याप्रकरणी तपासात आरोपी असलम खान वल्द जमशेद खान (३४, रा. काळे ले-आउट, ओमनगर, नागपूर) व शेख मोहसीन शेख मुसा उर्फ बाबा टायगर (रा. गिट्टीखदान, नागपूर) यांनी संगनमत करून शेख अशपाक हा पोलिसांना माहिती देतो, या कारणावरून जिवे मारण्याची धमकी दिली होती.
तर २८ जुलै २०२३ रोजी त्याच्याकडून २५ हजार रुपये घेतल्यानंतर त्याला पुन्हा १ लाख रुपयांची मागणी केली; पण शेख अशपाक याने पैसे घेण्यास नकार दिल्याने दोन्ही आरोपी चिडले. त्यातील असलम खान याने शेख अशपाकला कोराडी हद्दीतील साल्फियाबाद वस्तीमागील दिल्ली-नागपूर रेल्वेमार्गावर नेले. तिथे त्याला हातबुक्कीने व दगडाने मारहाण केली. त्यानंतर त्याची मान पकडून धावत्या रेल्वेवर डोके आपटले. या घटनेत शेख अशपाक रक्तबंबाळ झाला. यावेळी झालेल्या झटापटीत असलम खान हासुद्धा जखमी झाला. ही माहिती बयाणात उघड झाल्यानंतर कोराडी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.