धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील धरणी नाल्यात आज रेशन कार्डचा भला मोठा गठ्ठा सापडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांनी तहसीलदारांना याबाबत फोन लावत चांगलेच खडेबोल सुनावल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात अधिक कसे की, आज सायंकाळी साधारण 50 ते 60 रेशन कार्डांचा एक गठ्ठा धरणी नाल्यात वाहून आला. रेशन कार्डचा एवढ्या मोठ्या प्रमाणात गठ्ठा बघून नागरिकांमध्ये एकच चर्चेला उधाण आले. काही सुज्ञ नागरिकांनी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांना फोन लावून याबाबत सूचना केली. त्यानंतर श्री .महाजन यांनी धरणी परिसरात लागलीच भेट देत तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना फोन लावत रेशन कार्डचा गठ्ठा सापडल्या बाबतच्या घटनेची माहिती देत चांगलेच खडे बोल सुनावले. जर अशा पद्धतीने धान्यमालासह रेशन कार्डचा काळाबाजार होत असेल तर याबाबत कडक कारवाई करावी, अन्यथा भाजप तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला. दरम्यान, धरणी परिसरात रेशन कार्डचा गठ्ठा सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. तसेच हा गठ्ठा कुणी आणि का फेकला? याबाबत अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्याशी संपर्क साधला होऊ शकला नाही. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच रेशनचा काळाबाजारात विकले जाणारे धान्य नाशिकच्या पोलीस पथकाने धरणगावातील एका जिनिंगमध्ये पकडले होते हे विशेष !