भुसावळ (प्रतिनिधी) शहरात एकाच दिवसात तीन ठिकाणी गुरूवारी भर दुपारी चोरीचा प्रयत्न झाला. त्यात तापीनगर भागातील शालीन व्हिला अपार्टमेंटमध्ये दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास कारमधून आलेल्या चोरट्याने दाराची कडी तोडून घरातून १ लाखाचे सोने लंपास केले. दरम्यान, चोरटे उपद्रव माजवत असताना घर मालक महिला अचानक घरी परतल्या. त्यामुळे चोरट्यांनी त्यांना धक्का मारून पळ काढला. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारमधून आले चोरटे !
कारमधून आलेल्या चोरट्यांनी गुरुवारी दुपारी १.३० ते १.४५ या केवळ १५ मिनिटांत तापी नगरातील रहिवासी रेखा मनीष मंधनानी यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून १ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांचे पलायन एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. रेखा मंधनानी ह्या तापी नगरातील वीज कार्यालयाच्या बाजूला राहतात. गुरुवारी दुपारी त्या घराचा दरवाजा बंद करून दात्याच्या दवाखान्यात गेल्या होत्या. काही वेळाने एक डिझायर कार त्यांच्या घराजवळ येऊन थांबली. त्यातून काही जण खाली उतरून थेट मंधनानी यांच्या घरात गेले. दरवाजाला लावलेले कुलूप तोडून कपाटातील सोने व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज चोरला. चोरटे उपद्रव माजवत असताना अचानक रेखा मंधनानी ह्या घरी पोहोचल्या. यावेळी तिघां चोरट्यांनी त्यांना धक्का मारून पळ काढला. तर चौथा चोर कारमध्येच बसून होता. त्यामुळे चौघांनी घटनास्थळावरून अवघ्या काही क्षणात कारने पलायन केले. मंधनानी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांता गुन्हा दाखल झाला आहे. चोरीची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक गजानन पडघन, उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, सहाय्यक फौजदार सव्यद इकबाल, मोहमंद अली, संजय पाटील, समाधान पाटील, सोपान पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, चोरट्यांनी वापरलेल्या कारचा पोलिसांना मिळाला आहे.
मुक्ताई कॉलनीत अपार्टमेंटमध्ये तीन बंद फ्लॅटमध्येही चोरी !
शहरातील मुक्ताई कॉलनीतील ओंकार हाईट या अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी १२.३० ते १.१५ या वेळात तीन बंद घरांना लक्ष्य केले. सुरेश शंकर नेहेते यांच्या बंद घरात प्रवेश केला. पण, आतमध्ये महिला असल्याने त्यांनी पळ काढला. याच अपार्टमेंमधील राहुल शिवाजी पाटील यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून ८ हजार रूपये रोख व अर्धा ग्रॅम सोने लांबवले. ६ नंबरच्या प्लॅटमधील रहिवासी अजित उंबरे यांच्याही बंद घरात प्रवेश केला. पण, तेथे त्यांच्या हातात काहीही लागले नाही.