जळगाव (प्रतिनिधी) ‘आम्ही पोलिस आहोत, अशी थाप मारत जळगावात भरदिवसा वृद्धाची भरदिवसा वृद्धाची २८ हजारांत फसवणूक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर शनिवारी संध्याकाळी घडला.
पिंप्राळ्यात राहणारे रघुनाथ बाबूराव अंबुसकर हे सेल्समन असून ते कापडी पिशवीत दुकानदारांना पोहोचवायचा माल घेऊन सायकलीने आकाशवाणी चौकालगतच्या जैन पेट्रोल पंपाच्या शेजारील श्री कृष्णा डोसा सेंटर समोरून जात होते. याचवेळी दोन तरुण निळ्या रंगाच्या विना नंबरच्या दुचाकीने आले. त्यांनी अंबुसकर यांच्या अगोदर एका व्यक्तीला थांबून त्याच्या पिशवीची झडती घेतली. त्याच्या वस्तू परत करून सोडून दिले. त्यानंतर अंबूसकर यांना सांगितले की, आम्ही पोलिस असून पाठीमागून साहेबांची गाडी येत आहे. त्यांना माहिती मिळाली आहे की, कापडी पिशवीतून गांजा व अफूची विक्री करत फिरत आहेत. आम्हाला तुमची पिशवी तपासू द्या. त्यानुसार त्यांनी पिशवी तपासली त्यासोबतच त्यांनी अंबुसकर यांच्या खिशातील १८ हजार रुपयांची रोकड व हातातील पाच ग्रॅमची अंगठी काढून घेतली. अंबुसकर यांना बोलण्यात ठेवत त्यांच्या पिशवीत काहीतरी टाकल्यासारखे करून जाण्यास सांगून स्वतः निघून गेले, पुढे गेल्यावर अंबुसकर यांना पिशवीत पैसे व अंगठी नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
भामटे सीसीटीव्हीत कैद !
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अंबुसकर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली. त्यांच्या सोबत पोलिसांनी घटना घडली त्वा ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पोलिस असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्यांच्या दुचाकीला नंबरच नसल्याचे दिसले. तसेच दोघे तरुण हे ३५ ते ४० वयोगटातील आहेत.