नवी दिल्ली (वृत्तसंस्था) फोटो विकून पैसे कमावणं तसं काही नवं नाही. हल्ली बरेच लोक सोशल मीडिया, जाहिरात यासाठी फोटोशूट करून पैसे कमावतात. पण, अगदी एक साध्या सिम्पल तरुणाचा फोटो. तरी या फोटोमुळे या तरुणाने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. दिसायला तसा ठिकठाक पण चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नाहीत किंवा फोटोतही तसं काही खास नाही (man earn money by selfie). तरी या फोटोमुळे हा तरुण कोट्यवधी रुपये कमावतो आहे हे सांगून साहजिकच कुणालाही विश्वास बसणार नाहीच
फोटोंमध्ये झळकणाऱ्या या तरुणाचं नाव घोंजाली असं आहे. हा २२ वर्षीय तरुण मलेशियातील समेरंग सेंट्रल जावामध्ये राहतो. तो दररोज झोपून उठल्यानंतर कंप्युटर स्क्रीनसमोर बसून सेल्फी काढायचा. २०१७ ते २०२१ अशी गेली पाच वर्ष हा दिनक्रम त्याचा सुरु होता. या फोटोंपासून त्याला एक व्हिडीओ तयार करायचा होता. पण याच विचित्र छंदाने त्याला करोडपती केलं. त्याचे हे सेल्फी कोट्यवधी रुपयांना विकले गेले आहेत.
या फोटोंमध्ये असं आहे तरी काय?
घोंजालीने आपले सेल्फी NFT म्हणजे नॉन फंजीबल टोकन्समध्ये बदलले आहेत. हे ऑनलाईन करन्सीचं एक माध्यम आहे. लोक घोंजालीचे NFT खरेदी करून आपल्याकडे जमा करत आहेत. यामुळे त्याला पैसे मिळत आहेत. घोंजालीने ९ जानेवारीला आपले सेल्फी विकायला सुरुवात केली. फक्त ५ दिवसांतच आपले सेल्फी विकून तो कोट्यधीश बनला आहे. घोंजालीच्या सेल्फी विक्रीत सेलेब्सनेही मदत केली आहे. त्याच्या फोटोला इंडोनेशियातील कित्येत सेलिब्रिटींनी प्रमोट केलं होतं.