धरणगाव (प्रतिनिधी) मध्य प्रदेश एनसीबीने (mp narcotics control bureau) मध्यरात्री धरणगावातून ताब्यात घेतलेल्या विजय किसन मोहिते हा सराईत गांजा तस्कर असल्याचे समोर येत आहे. छत्तीसगडच्या (chhattisgarh) एका गुन्ह्यात विजय मोहिते, नंदू मोहिते आणि शेख शब्बीर अशा तिन्ही आरोपींना न्यायालयाने २०१९ मध्ये १५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
आलिशान वाहनांतून गांजाची तस्करी, पळून जातांना पोलिसांनी केली होती अटक !
मध्य प्रदेशातील कांकेर भागातील पथर्रीजवळ दोन आलिशान वाहनांतून ओडिशातून गांजाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना कोतवाली पोलिसांनी २०१७ मध्ये अटक केली होती. त्यात नंदू मोहिते (२५), मयूर देसले (२३), प्रकाश मोहिते, विजय मोहिते (३५) आणि शेख शब्बीर (५८) यांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्या तस्करांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गांजा महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे नेला जात होता. जप्त करण्यात आलेल्या एक क्विंटल गांजाची बाजारातील किंमत ५ लाख रुपये होती. त्याचबरोबर दोन्ही वाहने जप्त करण्यात आली होती. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी दोन वाहने थांबवून त्यांचे नाव व पत्ता विचारला असता, योग्य उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. तपासादरम्यान दोन्ही वाहनांमधून पन्नास-पन्नास किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यांना पकडताच तस्कर जंगलाच्या दिशेने पळू लागले. एसआय विक्रांत सोन, पुरुषोत्तम कुर्रे, एचसी नगरची, एएसआय भुजबळ साहू, प्रिन्सिपल कॉन्स्टेबल एसपी सिंग, ठाणेेश्वर साहू, कॉन्स्टेबल शक्ती सिंग, तोमेश्वर साहू, एनआर ठाकूर, सचिन शोरे यांनी तस्करांचा पाठलाग करून काही अंतरावर त्यांना पकडले होते.
तिघांना १५ वर्षे सक्तमजुरी व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा
गांजा जप्त केल्यावर पोलिसांनी त्यात नंदू मोहिते, मयूर देसले, विजय मोहिते आणि शेख शब्बीर या तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर नमुने तपासासाठी रायपूरला पाठवले होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना एनडीपीएस विशेष सत्र न्यायाधीश हेमंत सराफ यांच्या न्यायालयात हजर केले. जेथे साक्षीदारांचे म्हणणे व आरोपींचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने तिघांना गांजाची तस्करी केल्याप्रकरणी फेब्रुवारी २०१९ मध्ये १५ वर्षे सक्तमजुरी व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. शिक्षेसंदर्भातील वृत्त हिंदीतील प्रसिद्ध दैनिक पत्रिकाने आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे.
मध्य प्रदेशातील इंदोर येथील गांजा तस्करीच्या गुन्ह्यात धरणगावातून विजय किसन मोहिते (रा. सरस्वती कॉलनी, एरंडोल, ह.मु. रामकृष्ण नगर, धरणगाव एरंडोल रोड) अटक करण्यात आली आहे. इंदोर येथे जुलै महिन्यात गांजा तस्करीचा एक गुन्हा दाखल होता. या गांजा तस्करीचे कनेक्शन एरंडोल-कासोदा भागात असल्याची माहिती मध्य प्रदेश एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचून विजय किसन मोहितेला ताब्यात घेतले.
विजय वाघमारे
92840 58683