जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विटनेर येथे भरधाव येणाऱ्या कारने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली.
तालुक्यातील विटनेर येथील संतोष दशरथ पाटील यांनी आपल्या शेतातील कापूस वेचण्यासाठी शेतमजूर रोजंदारीने लावले होते. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास मजूरांना शेतात पाणी नेण्यासाठी दुचाकी (एमएच १९ एझेड ४३७७) ने जात होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने जाणारी स्विप्ट डिझायर (एम.एच. १९ सी.एच. २३३३) कारने जोरदार धडक दिली. यात धडकेत दुचाकीस्वार संतोष पाटील यांच्या डोक्याला जबर मार बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाने सिटबेल्ट लावले असल्याने एअरबँग उघडल्या. त्यामुळे चालक बचावला. दरम्यान घटनास्थळाहून कार चालक फरार झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या संतोष दशरथ पाटील यांना त्यांचे पुतणे सुरेश पाटील यांनी देवकर मेडीकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. या प्रकरणी सुरेश पाटील यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला स्विफ्ट कार चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.