धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पोलीसांनी रात्रीच्या सुमारास थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री 11 वाजता नाकाबंदी दरम्यान चोपड्याकडून जळगावकडे जात असताना धरणगाव पोलिसांनी संशयित कारला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, कार चालकाने पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच कार चालकाने धरणगाव बस स्थानकाजवळून यू-टर्न घेत पारोळा रस्त्याकडे वळवली आणि झाडाझुडपांमध्ये कार टाकून दोन्ही आरोपी फरार झाले. पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली असता तब्बल 40 किलो गांजा आढळला, ज्याची किंमत साधारण दहा लाख रुपये आहे. तर कार आणि गांजा असा एकूण 20 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी कारच्या केलेल्या पाठलागाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून गांजाची तस्करी करणारे आरोपी कोण? ते गांजा नेमका कुठे घेऊन जात होते?, याबाबतचा तपास आता पोलिसांनी सुरू केला. आरोपींच्या शोधार्थ धरणगाव पोलिसांनी पथक रवाना केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.