जळगाव : (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवत ४६ पैकी ४६ जागा जिंकून १०० टक्के स्ट्राइक रेट राखला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या दोन्ही शिलेदारांच्या प्रभावी कामगिरीमुळे भाजपने राज्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने एकूण ७५ पैकी तब्बल ७० जागांवर घवघवीत यश मिळवत जळगावमध्ये निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे आमदार मंगेशदादा चव्हाण आणि शहराचे आमदार राजूमामा भोळे या जोडगोळीचं अचूक नियोजन निर्णायक ठरलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे सोपवली होती. यापूर्वी जिल्हा दूध संघात सत्तांतर घडवून भाजपची सत्ता प्रस्थापित करणे, जिल्हा बँक तसेच नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमधील यशस्वी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. आमदार चव्हाण यांनी ती पूर्ण ताकदीने आणि अचूक रणनीतीने पार पाडत पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली.
गेल्या वीस दिवसांपासून आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव शहरात ठाण मांडून आमदार राजूमामा भोळे यांच्यासोबत समन्वय साधत महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण केलं. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने संवाद साधत निवडणुकीची दिशा ठरवण्यात आली. सामाजिक व राजकीय समीकरणांचा अचूक अभ्यास करून जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना न्याय देणारी उमेदवार निवड प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.















