अमरावती (वृत्तसंस्था) अचलपूर एका ३० वर्षीय विवाहीतेने तिच्यापेक्षा लहान असलेल्या २२ वर्षीय युवकाला प्रेमजाळ्यात अडकविले आणि मग त्याला पैशांसाठी ‘ब्लॅकमेल’ करणे सुरू केले. हा त्रास असह्य झाल्यामुळे युवकाने त्या विवाहितेच्याच घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, याबाबत ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी परतवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखलदरा तालुक्यातील ५० वर्षीय वडिलांनी याबाबत तक्रार केली आहे. प्रेयसी ही परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच एका गावातील रहिवासी आहे. सदर युवक हा रोजगार हमी योजनेमध्ये मजुरी करीत होता. सोबतच तो मुक्त विद्यापीठातून शिक्षणही घेत होता. त्यादरम्यान सदर विवाहिता व युवक यांच्यात ओळख होऊन गत दीड वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. या काळात युवक कित्येक दिवस त्या प्रेयसीच्याच घरी राहत होता. त्यामुळे शंका आल्याने वडिलांनी सहा महिन्यांपूर्वी मुलाला विचारणा केली. त्यावेळी त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. त्या विवाहितेसोबत प्रेमसंबंध झाल्यानंतर दोघांचेही खासगीतील फोटो सोशल मीडियावर टाकून ती बदनामी करण्याची धमकी देत होती. त्यासाठी विवाहित प्रेयसी सातत्याने पैशांची मागणी करीत असल्याने युवक चक्रव्युवहात अडकला होता.
हा प्रकार कळल्यावर वडील मुलाला घेऊन त्या विवाहितेकडे समजावून सांगण्यासाठी गेले. त्यावेळी तिने आता त्रास देणार नसल्याचे मान्य केले; परंतु गत तीन महिन्यांपासून युवक पुन्हा तणावात दिसत होता. आपल्याकडून एक चूक झाली असून, त्याचा गैरफायदा घेत ती विवाहिता पुन्हा पैशांसाठी तगादा लावत असल्याचे युवकाने वडिलांना सांगितले. त्यावेळी त्याला धीर देत वडिलांनी अमरावती येथे एका महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळवून दिला. त्यामुळे तो अमरावतीतच राहत होता; मात्र १० ऑगस्टच्या रात्रीनंतर त्या विवाहितेनेचे पोलिसांना कॉल करून आपल्या घरात सदर युवक आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. पोलीस जाईपर्यंत त्या युवकाने आत्महत्या केली. त्यामुळे विवाहितेनेच त्याला पैशांसाठी बोलावून त्रास दिला असावा व त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, अशी तक्रार मृतक युवकच्या वडिलांनी दिली. या प्रकरणीपोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.