धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथे एका २८ वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी मानला जात आहे. मांगिलाल भाईदास बारेला (व्यवसाय- शेती, रा. मेधड्या पाणी ता. वरला जि. बडवाणी म.प्र., हल्ली मुक्काम रा. नामदेव रामकृष्ण भोडे यांच्या खळ्यात नांदेड), असे मयत तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी की, मांगिलाल बारेला याने काल दुपारी गावातील एका भंडाऱ्यात जेवण केले. त्यानंतर तो दुपारी भर उन्हात शेतात कामाला गेला. याच ठिकाणी त्याला कदाचित उष्माघाताचा फटका बसला आणि शेतातच त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत मयताच्या भाऊने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे हे करीत आहेत. दरम्यान, मयत तरुणाने मद्यप्राशन देखील केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उष्माघाताची लक्षणं कशी ओळखाल?
चक्कर येणे,डोकं दुखणे,सुस्ती आल्यासारखं वाटणे आणि डोकं हलकं झाल्यासारखं वाटणे,गरम होत असूनही घाम न येणे,त्वचा लालसर होणे,त्वचा कोरडी पडणे,अशक्तपणा जाणवणे,मळमळ होणे, उलट्या होणे,जोरात श्वास घेणे,हृदयाचे ठोके वाढणे जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणामध्ये ही वरील लक्षणं दिसून आली. तर त्याला उष्माघाताचा त्रास होतो आहे हे समजावं आणि संबंधित व्यक्तीस तातडीने उपचार उपलब्ध करुन द्यावेत. तसेच रुग्णाला झोपवून त्याचे पाय थोड्या उंचीपर्यंत वर करा,रुग्णाला पाणी द्या, तो शुद्धीत असेल तर त्याला ग्लूकोजयुक्त ड्रिंक्स द्या, थंड पाणी, स्प्रे किंवा आईस पॅकने त्याचं शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.
उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करावे?
भरपूर प्रमाणात पाणी प्या, दररोज 8 ग्लास पाणी प्यायला हवं, ते शरीरासाठी आवश्यक आहे. अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर करा, त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहील. हलका पण पौष्टिक आहार घ्या, आहारात काकडी, कलिंगड, ताक यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा.सुती कपड्यांचा वापर करा.बराच वेळ उन्हात राहावं लागत असेल तर त्वचेवर पाणी शिंपडत राहा, तसेच थोड्या थोड्या वेळानी पाणी प्या. दुपारचं बाहेर पडणं टाळा, विशेषकरुन सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत बाहेर उन्हात पडू नका.उन्हात असाल तर टोपी, छत्री, स्कार्फ यांचा वापर करा. अतिरिक्त मद्यमान, साखर असलेले पेय किंवा कॅफेन असलेले पेय टाळा, यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अतिप्रमाणात व्यायाम करणं टाळा