मुंबई (वृत्तसंस्था) सीबीआयने बुधवारी रात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी व वकील आनंद डागा यांना ताब्यात घेतले होते. गौरव यांची सुमारे वीस मिनिटे चौकशी केल्यानंतर सीबीआयकडून सोडण्यात आले. मात्र, डागा आणि सीबीआय कार्यालयातील उपनिरिक्षक अभिषेक तिवारी यांना सीबीआयचे पथक दिल्लीला घेऊन गेले आहे. दिल्लीतील सीबीआय न्यायालयात त्यांना हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.
देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याचा सीबीआयचा कथित अहवाल मागील आठवड्यात सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याप्रकरणी सीबीआयने सीबीआयचे उपनिरिक्षक अभिषेक तिवारी यांना अटक केली आहे. हा अहवाल बाहेर आल्यानंतर सीबीआयने केलेल्या प्राथमिक तपासात देशमुख यांच्या लिगल टीमने तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले आहे. त्यामुळे तिवारी आणि डागा यांना दिल्लीला नेण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. परमबिर सिंग याच्या लेटरनंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.