धरणगाव (प्रतिनिधी) येथील शितल अकॅडमी या संस्थेने त्यांचा दहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला. याप्रसंगी मनोगत, नृत्य आणि बक्षीस वितरण असे विविधांगी कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम गांधीजींचा स्मृतिदिन व हुतात्मा दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या क्रांतिवीरांना २ मिनिट मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. शितल अकॅडमीचे संचालक शशिकांत माळी यांनी आपल्या प्रास्ताविकातून शितल अकॅडमी चा प्रवास सांगितला. १० वर्षांपूर्वी लावलेले छोटेसे रोपटे आज चांगल्या प्रकारे नावारूपाला आले आहे. याचे समाधान वाटते. शितल अकॅडमी च्या माध्यमातून इंग्रजीचे शिक्षण घेऊन अनेक मुलं उच्चशिक्षित झाले आहेत. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात, इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वाच्या क्षेत्रात शितल अकॅडमीचे योगदान अभिमानास्पद असल्याचे मत शशिकांत माळी यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थांनी शितल अकॅडमी बद्दलचा अनुभव, इंग्रजी भाषेचे महत्व, संभाषण कौशल्य, इंग्रजीचे जागतिक स्तरावर असलेलं महत्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये एकता महाजन, राज पाटील, क्रिष्णा सोनवणे यश पाटील, लीना चौधरी, वर्षा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून शितल अकॅडमीच्या १० व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी भाषेचे सोप्या पद्धतीने अध्यापन करून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात शितल अकॅडमी चा मोलाचा वाटा आहे. शिका, खूप मोठे व्हा आणि आपल्या आई – वडिलांचा नावलौकिक वाढवा, असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.
शितल अकॅडमीच्या विद्यार्थांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार करत हिंदी – मराठी तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन आणि नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. यामध्ये अनुष्का चौधरी, शालिनी महाले, जयश्री पवार, सप्तमी चौधरी, अनिकेत कापडणे, हर्षदा पाटील, लावण्या पाटील यांनी गायन तर तनिष्का सोनार, मानसी कासार, दर्शन पाटील, लक्ष्मी पाटील, जागृती पाटील, दिपिका महाजन यांनी नृत्य सादर केले. शितल अकॅडमी तर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रथम आणि व्दितीय क्रमांक संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रांजल चौधरी, पियुष पाटील, अनुष्का चौधरी, गुंजन महाजन (लिंबू चमचा), मोहिनी महाजन, यजुर्वेद आहेराव (संगीत खुर्ची), रिया पाटील, वैष्णवी पाटील (शब्द स्पर्धा), लीना चौधरी, वर्षा महाजन (सुंदर हस्ताक्षर स्पर्धा), गीता चौधरी, हस्नेन पठाण (चित्रकला स्पर्धा), धनश्री पाटील, राज पाटील, क्रिष्णा सोनवणे, एकता महाजन (संभाषण स्पर्धा), कुणाल पाटील, कल्पेश पाटील (पेपर डान्स स्पर्धा), धनश्री पाटील, ज्ञानेश्वरी पाटील (शब्द लेखन स्पर्धा) यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल अकॅडमी चे संचालक शशिकांत माळी तसेच त्यांचे सहकारी गोपाल अग्निहोत्री, हर्षाली माळी, भाग्यश्री धनगर, सुषमा पाटील, अर्चना पाटील, रुपाली चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन शितल अकॅडमीचे विद्यार्थी तुषार चौधरी आणि प्रांजल चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन धनश्री पाटील हिने केले.