धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज १२ जानेवारी २०२१ रोजी स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे राजमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. माँसाहेब जिजाऊंचे मार्गदर्शन आणि पाठबळ होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण केलं. राजमाता जिजाऊ स्वराज्य संकल्पिका व स्वराज्य प्रेरिका होत्या तसेच शिवरायांच्या खऱ्या गुरू स्वतः माँसाहेब जिजाऊ होत्या. जिजाऊंचा आदर्श जर प्रत्येक मातेने घेतला तर नक्कीच शिवराय घडू शकतील. आजच्या युवकाला मन आणि मनगट मजबूत बनवायचे असेल तर त्यांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे कार्य समजून घेतले तर समाजातील विकृत प्रवृत्ती नक्कीच बदलता येईल, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले. आजच्या भावी पिढीने या दोन्ही महापुरुषांचे विचार अंगिकारले पाहिजेत. आया – बहिणींचा सन्मान राखला पाहिजे, आई – वडिलांचा आदर राखला पाहिजे तीच खऱ्या अर्थाने या महापुरुषांना आदरांजली ठरेल, असे मत दहावीच्या वर्गशिक्षिका भारती तिवारी यांनी मांडले. माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे, असे मत प्राचार्या चैताली रावतोळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला भारती तिवारी, अनुराधा भावे, गायत्री सोनवणे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, स्वाती भावे, शिरीन खाटीक, दामिनी पगारीया, सपना पाटील, नाजनिन शेख, अमोल सोनार, लक्ष्मण पाटील हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता ९ वी – १० वी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.