नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना आटोक्यात आला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देशातील पहिल्या लॉकडाऊनला (Lockdown) दोन वर्षे पूर्ण झाली असून केंद्र सरकारने बुधवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व कोरोना निर्बंध (Corona Restrictions) हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
दोन गोष्टी पाळाव्या लागणार
येत्या ३१ मार्चपासून देशातील कोविड १९ प्रतिबंध उठविण्यात आले आहेत. आता फक्त दोन गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. यामध्ये सहा फुटांचे अंतर आणि मास्क घालणे पाळावे लागणार आहे. हे नियम आधीसारखेच लागू राहणार आहेत.
कोरोनाचे रुग्ण वाढू लागले तर..
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,778 नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. आधीच्या तीन लाटांमध्ये अशी परिस्थिती कधीच आली नव्हती. मात्र, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या कमी झालेली असली तरी रुग्णांच्या मानाने ती खूप जास्त आहे. परिस्थिती आटोक्यात आल्याने केंद्र सरकारने डिजास्टर मॅनेजमेंट अॅक्ट हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचे रुग्ण वाढू लागले तर पुन्हा लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
DM कायदा लागू करणारा आदेश मागे
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी DM कायदा लागू करणारा आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या पत्रात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डीएम कायद्यांतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे काढून टाकण्यास सांगितले आहे.