नाशिक (प्रतिनिधी) शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी दोघांनी चेनस्नॅचिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुचाकीवर पाठलाग करीत भामट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविले होते. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने उपनगर भागात दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली दुचाकी व सोन्याची लगड असा १ लाख ९० हजाराचा ऐवज जप्त केला आहे.
प्रथमेश नितीन उशीर (२२, रा. शांतीपार्क टाकळीरोड) व जोएल डॅनिल म्हस्के (१९, रा. पारिजातनगर, जेलरोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या गुरुवारी (दि. ११) रामवाडी परिसरात ही घटना घडली होती. वकिलवाडीतून जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करीत भामट्यांनी आदर्शनगर भागातील महिलेचे घर गाठले. पत्ता विचारण्याचा बहाणा करीत बोलण्यात गुंतवून भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. महिलेने प्रतिकार करीत एकास पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र, दुसऱ्याने त्यांच्या हातावर बुक्का मारत दोघांनी धूम ठोकली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चोरट्याचा माग काढत असतांना युनिटचे हवालदार विशाल काठे व नाझिमखान पठाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. दोघे संशयित (एमएच १५ डीजी २४७१) या दुचाकीवर उपनगर भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावला असता दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. संशयितांनी शेअर मार्केट मधील फॉरेक्स व ट्रेडिंगमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी ही चेनस्नॅचिंग केल्याची कबुली दिली. संशयितांच्या अटकेने जबरी चोरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
















