चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हिरापूर स्टेशनसमोरील रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजूर वाहणारे वाहन आणि मालवाहू पिकअपमध्ये झालेल्या जबर अपघातात २ महिला जागीच ठार झाल्या तर १४ मजूर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अपघाताचे वृत्त शहरात कळताच ग्रामस्थ, पोलीस, आरोग्य यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते काही वेळातच तेथे पोहोचले अन् जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
न्याय डोंगरीकडून चाळीसगावकडे २० ते २५ मजूर घेवून येणारे ढंपर (एमएच ०५, के- ९९३६) हे चाळीसगावकडून तळेगावकडे जाणाऱ्या मालवाहू महिंद्रा मॅक्झिमो (एमएच- २०, सीजी ४४२९) वर वेगाने १९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास धडकले. या अपघातात वाहन उलटून झालेल्या अपघातात डंपरमधील मजूर सोनीबाई सोमनाथ यादव (वय ३०) व सरस्वती रामप्रसाद उईके (वय १७) या दोघ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनातील इतर १४ मजूर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिक, पोलीस, आरोग्य यंत्रणा काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तेथून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शांताराम मरकाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव पोलीस करत आहेत.