जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातील एका चार वर्षाच्या बालिकेवर अमानूषपणे अत्याचार केल्याची घटना २०२१ मध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी १७ व्या दिवशी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. तर दुसरीकडे अवघ्या ३८ व्या दिवशी म्हणजेच आज न्यायालयात सर्व साक्षीदार तपासून झालेत आहेत. यामुळे पुढील १५ दिवसात निकाल येण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या गुन्ह्यात इतक्या लवकर दोषारोपपत्र दाखल करणे व न्यायालयात इतक्या लवकर खटला चालवून संपविणे प्रथमच घडले असल्याचे बोलले जात आहे.
काय होती नेमकी घटना ?
या संदर्भात अधिक असे की, चाळीसगाव शहरातील आनंदवाडी भागात एकाच्या घरी आलेल्या चार वर्षी चिमुरडीला ‘ बिस्कीटचा पुडा ’ घेवून देता असे सांगून निर्जनस्थळी नेत तिच्यावर अमानूषपणे अत्याचार केल्याची घटना दि,२८ नोव्हेंबर २०२१ रोजी मध्यरात्री १.२५ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल झाली होती. या प्रकरणी आज न्यायालयात सरकार पक्षाने एकुण १३ साक्षीदार केवळ आठ तारखांमध्ये तपासुन संपूर्ण पुरावा सादर केला. चाळीसगाव शहरातील एका भागात एकाच्या घरी सावळाराम भानुदास शिंदे(२७) रा. लोंढरे ता.नांदगाव, जि. नाशिक हा नातेवाई त्याच्या फारकतीचे काम असल्यामुळे आलेला होता. त्यावेळी आरोपीने व पीडितेच्या घरच्यांनी रात्री एकत्र जेवण केले. त्यानंतर चार वर्षाच्या पीडितेला चॉकलेट व बिस्कीट खायला घेऊन जातो, असे पीडितेच्या आईला सांगून पीडितेला रात्री ९ वाजेला घेऊन गेला. घरी आलेला नातेवाईक बराच वेळ होऊन सुद्धा येत नाही म्हणून पीडितेच्या आई व वडील यांनी घरी आलेल्या पाहुण्याच्या व पीडितेच्या शोध घेतला, पण ते मिळून आले नाही. त्यानंतर पीडितेची आई घरी असतांना रात्री १० वाजेच्या सुमारास घरी आलेला पाहुणा पीडितेला कडेवर उचलून घरी आला. तेव्हा पीडिता खुप रडत होती, म्हणुन तिच्या आईने तिला रडण्याचे कारण विचारले असता पीडितेने तिच्यावर तिच्याच घरी आलेल्या पाहुण्याने कसा लैंगिक अत्याचार केला याबाबतचे सर्व कथन सांगितले.
लैंगिक अत्याचारामुळे पिडीतेला खूप प्रमाणात जखमा
पीडितेच्या नातेवाईकांनी पाहुण्याला विचारले असता तो घाबरून घरातून पळून जातांना पहिल्या मजल्यावरून घाई घाईने उतरतांना खाली पडला व बेशुद्ध झाला. त्यावेळी परिसरातील माजी नगरसेवक यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलीस सुद्धा त्वरीत घटनास्थळी आले व पीडितेच्या घरी आलेला पाहुणा व पीडिता यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी पीडितेची तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे प्राथमिकरित्या दिसून आले परंतु तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे तिला खूप प्रमाणात जखमा झाल्या असल्यामुळे व तिचे ऑपरेशन करणे गरजेचे असल्यामुळे तिला डॉक्टरांनी वैद्यकिय महाविद्यालय,जळगाव येथे पाठवले होते.
पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल
या घटनेची पीडितेच्या आईने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला घरी आलेल्या पाहुण्याच्या विरुद्ध बलात्काराची भारतीय दंड विधानाच्या तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचे कामी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तपास आरोपीला अटक केली व पंचनामे केले. परंतु सदरची घटना अत्यंत क्रूर स्वरूपाची व केवळ चार वर्षाच्या मुलीवर घडलेली असल्यामुळे पोलिस अधीक्षक यांच्या तोंडी आदेशाने या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी कैलास गावडे यांच्याकडे दिला.
केवळ १७ दिवसात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
सदरचा गुन्हा अत्यंत निर्दयीपणे व क्रूररित्या केलेला असल्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचे कामी केवळ १७ दिवसात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकरपक्षातर्फे सदरचा खटला जिल्हा सरकारी वकील केतन ढाके पाहत असतांना त्यांनी न्यायालयात सदरचा खटला लवकरात लवकर ते चालवणेस तयार असल्याचे विशेष न्यायाधीश एस.एन.गाडेकर(माने) यांना कळविले व तसा अर्ज दाखल केला. तसेच गुन्ह्याची थोडक्यात हकीकत व पीडितेवर झालेल्या अत्याचार बाबत कळविले. त्यामुळे न्यायालयाने सुद्धा सदरचा खटला चालवण्याचे मान्य केले.