चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील पिलखोड शिवारात शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत जबर जखमी झालेल्या बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे.
चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावर २७ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाल्याची माहिती चाळीसगाव वन परिक्षेत्र कार्यालयाला मिळाली हाेती. ही माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा बिबट्या रस्त्यालगतच्या वाल्मीक पुंडलिक पवार यांच्या मक्याच्या शेतात जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आला.
जखमी बिबट्याला उपचारासाठी जेरबंद करणे आवश्यक असल्याने वन कर्मचाऱ्यांकडून सलग ६ तास बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. शोध सुरु असतांना एकदा तर जखमी बिबट्याने वन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. बिबट्याला पकडण्यासाठी थरारक माेहीम सुरू असतानाच २८ रोजी पहाटे ३ वाजता बिबट्या मक्याच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला.
















