चाळीसगाव (प्रतिनिधी) सेवानिवृत्त शिक्षकाने बँकेतून काढून आणलेली २ लाख रुपयांची रोकड मोटारसायकलच्या डिक्कीतून चोरट्याने लांबवली. ही घटना भडगाव रोडवर सोमवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, टाकळी प्रचा येथील सेवानिवृत्त शिक्षक सुधाकरराव विठ्ठल पाटील यांनी सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील भडगाव रोड वरील युनियन बँकेतून दोन लाख रुपयांची रक्कम काढली व ही रक्कम त्यांनी बँकेच्या बाहेर मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली. त्याचवेळी पासबुक बँकेत राहून गेल्याने ते पुन्हा बँकेत गेले. हीच संधी साधत बाहेर पाळत ठेवणाऱ्या तिघांपैकी एकाने डिक्की उघडून त्यातून रक्कम काढून घेतली. काही वेळेनंतर सुधाकरराव पाटील हे परत आल्यावर डिक्कीत ठेवलेली रक्कम गायब झाल्याचे दिसून आली. त्यानंतर त्यांनी बँक व बाहेर अनेकांना ही माहिती दिली. सायंकाळी पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहेत.