मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या लेटरबॉम्बची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चांदीवाल कमिशनचा (Chandiwal Commission) अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. त्यामध्ये परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले आरोप हे खोटे असल्याचं नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परमबीर सिंग यांनी लेटरबाॅम्बमधून १०० कोटी रुपयांचा आरोप अनिल देशमुखांवर केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आयोगाच्या अहवालात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चांदीवाल आयोगाने सचिन वाझे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाब घेण्यात आल्या होत्या. आयोगाच्या अहवालातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिनचीट देण्यात आल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.















