जामनेर (प्रतिनिधी) डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंस (डीजीजीआय) अर्थात वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाच्या नाशिक युनिटने तालुक्यातील पहूर व जळगाव येथील एकाला ताब्यात घेतल्याचे कळते. दरम्यान, या प्रकरणात दोघांची अत्यंत सुनियोजित पद्धतीने फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील मेडिकलवाल्या तरुणाला नौकरीचे आमिष दाखवून फसवण्यात आले. त्याच्या नावावर तब्बल ५ कोटी ६६ लाखाचा घोळ करण्यात आला आहे. दुसरीकडे अन्य तरुणाला तर त्याच्यानावावर कंपनी असल्याचेही माहित नाही.
डीजीजीआयचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिज भूषण त्रिपाठी यांच्या पथकाने बुधवारी ही धाड टाकली होती. दरम्यान, जीएसटी घोटाळ्याशी संबंधित हे धाडसत्र होते. त्यानुसार एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले होते. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. याप्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यानुसार प्रवीण विठ्ठल कुमावत (रा. पहूर) या तरुणाला नौकरीची गरज होती. एकेदिवशी प्रवीणचा मित्र कैलास भारुडे याने माझे मेहुणे पिंटू इटकारे जळगावला बँकेत नौकरीला आहेत. मी त्यांना सांगतो तू भेटून ये असे सांगून जळगावला भेटायला पाठवले. त्यानुसार प्रवीण कुमावत हा इटकरेला भेटायला रॉयल गोल्ड फायनान्समध्ये गेला. दोघांची चर्चा आणि इटकरेने नौकरी देण्याची कबुल केले. परंतू पुढील वेळेस येताना जळगावातील एखादं बँकेत खाते उघडून आणण्यास सांगितले. परंतू आपल्याकडे खाते उघडण्यासाठी पैसे नाहीत, असे प्रवीणने सांगितले. त्यावर तू कागदपत्र घेवून ये, आम्ही सर्व बघून घेवू असे सांगितले.
कागदपत्र दिल्यानंतर प्रवीणला इटकरेने आणखी एक ऑफर दिली. त्यानुसार आणखी एक कंपनी आम्ही तयार करतोय. त्यात तुला पण भागीदार घेतोय. रॉयल गोल्ड फायनान्सचा पगार तर तुला मिळेलच. परंतू या नवीन कंपनीच्या प्रॉफीटमधून दरमहा १० ते १२ हजार रुपये देखील मिळतील, असे प्रवीणला सांगितले. त्यानंतर प्रवीणच्या नावाने चालू खाते उघडण्यात आले. साधारण ८ महिने प्रवीणला १० ते १२ हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर एकेदिवशी कंपनी व्यवस्थित चालत नाहीय, असे सांगून प्रवीणला पैसे देणे बंद करण्यात आले. परंतू बुधवारी ज्यावेळी वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाचे पथक प्रवीण कुमावत यांच्याकडे पोहचले. तेव्हा त्यांना सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. मागील दोन दिवसात प्रवीणने आपल्या खात्याची सर्व काढली तेव्हा त्याच्या लक्षात आले की, साधारण ५ कोटीचा ६६ लाखाचे व्यवहार त्याच्या खात्यातून फिरवण्यात आले आहे. दुसरीकडे अशोक सुरवाडे या तरुणाला तर हे देखील माहित नव्हते की, त्याच्या नावावर कुठली स्टील कंपनी आहे म्हणून !
दरम्यान,माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. सर्व व्यवहाराची माहिती घेतली असून लवकरच रीतसर पोलिसात फिर्याद देणार आहे, अशी माहिती प्रवीण कुमावतने ‘द क्लीअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात माझ्या सारख्या अनेकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून हा घोटाळा कोट्यांवधीच्या घरात असून डीजीजीआयच्या पथकाने पिंटू इटकर (जळगाव) व कैलास भारुडे (पहूर) या दोघांना ताब्यात घेतल्याचे देखील प्रवीणने सांगितले. दरम्यान, या दोघांना आज नाशिकच्या कोर्टात हजर करण्यात आल्याचेही कळते.