नागपूर (वृत्तसंस्था) गोड बोलून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेस बंगल्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपरवाही शिवारात गुरुवारी (दि. ७) रात्री घडली. दरम्यान, पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत संशयित आरोपी बाल्या ऊर्फ जितेंद्र रामाजी शेंडे (वय ४०) याला अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, बाल्या गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिडीतेच्या घरी गेला आणि गरोदर महिलेच्या पोटात कळा येत असल्यामुळे तुम्ही माझ्यासोबत उपरवाही शिवारातील शेतात असलेल्या बंगल्यात येण्याबाबत विंनती केली. पिडीतेने विश्वास ठेवत बाल्यासोबत बंगल्यावर गेली. परंतू तिथं कुणीही नसल्याचे पाहून पीडितेला शंका आली. त्यामुळे पिडीतेनं मी तुझ्या आईसारखी असल्याची गयावया करून घरी सोडण्याची विनंती केली. मात्र, बाल्याने बळजबरीने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर झालेला प्रकार कुणालाही सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर बाल्याने पिडीत वृद्धाला मोटारसायकलने घराजवळ सोडून देत पळ काढला.
पीडितेने स्वत:ला सावरत घडलेला प्रकार गावाच्या सरपंच यांना सांगितला. यानंतर याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांत भादंवि ३५४, ३५४ (अ) ५०५ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तपासचक्र फिरवीत संशयित आरोपी बाल्या शेंडे यास मध्यरात्री उपरवाही येथून अटक केली. दरम्यान, पिडीता गावात एकटीच राहते. याच गोष्टीचा फायदा आरोपीने उचलला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ ने दिले आहे.