अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव येथील चेतन राजेंद्र चौधरी याने सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. यंदा घेण्यात आलेला सीए फाउंडेशन कोर्सेस परीक्षेत ४०० पैकी २४४ मार्क्स मिळवत तो तालुक्यात अव्वल आलेला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या परीक्षेला देशभरातून ७१ हजार ९६७ परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १९ हजार १५८ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.
चेतन हा अमळगाव येथील वृत्तपत्र विक्रेता राजेंद्र धोंडू चौधरी यांचा मुलगा असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तो शिक्षण घेत आहे. यापूर्वी अमळगाव येथील आदर्श विद्यालय, अमळगाव येथे दहावीत तर प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे बारावी बोर्ड परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादले होते. तो प्रताप महाविद्यालयात एस.वाय.बी.कॉम. या वर्गात शिक्षण घेत आहे. पहिल्याच प्रयत्नात तो सीए फाउंडेशन परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला असून तालुक्यात अव्वल येण्याचा मान त्याने मिळवत अमळगाव व अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात यशाचा तूरा रोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल समाजाच्या सर्वस्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.