रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील सख्ख्या बापानेच आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी सावदा पोलिसात नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय पिडीता आपल्या आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. दि २१ रोजी पिडीतेची आई सकाळी नेहमी प्रमाणे कामावर निघून गेली. त्यानंतर ८ वाजेच्या सुमारास पिडीता घरात भांडी घासत असतांना बापाने पिडीतेस बळजबरीने ओढून घरात नेले. याठिकाणी नराधम बापाने पिडीतेवर अत्याचार केला. पिडीतेने आरडा-ओरडा केल्यानंतर शेजारऱ्यांनी घरात धाव घेत पिडीतेची नराधम बापापासून सुटका केली. तसेच त्याला चोप देखील दिला. यानंतर नराधम बापाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सावदा पोलिसात नराधम बापाविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत. तर फरार नराधम बापाचा शोध पोलीस घेत आहेत.