मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे. पावसाळ्यात आधी दौरे करणारे राज्यपाल आता कुठे आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी बोलताना महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सरकारवरही निशाणा साधला आहे. राज्यात महापुराने थैमान घातले आहे. मात्र, सरकार स्थापन होऊन 14 दिवस उलटल्यानंतरही मंत्रिमंडळाचे अस्तित्व नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सध्या वाऱ्यावर आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता राज्य सरकारला मार्गदर्शन का करत नाही, असा खोचक सवालही त्यांनी विचारला. उठसुठ महाविकास आघाडीच्या सरकारला सल्ले देणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मागील 12 दिवसांपासून गायब आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राऊत म्हणाले, दोन वर्षांपुर्वी राज्यात पूर आलेला असताना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व मंत्रिमंडळ, प्रशासन रस्त्यावर असतानाही राज्यपालांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, आता महाराष्ट्र संकटात असताना सरकारही अस्तित्वात नाही. 2 वर्षांपुर्वी राज्याच्या दौऱ्यावर निघालेले राज्यपाल आता राजभवनाच्या बाहेरही निघत नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनाची सरकारला आता खरी गरज आहे. मविआला वारंवार सल्ले देणारे राज्यपाल आताच्या सरकारला मार्गदर्शन का करत नाही, असा सवाल राऊतांनी केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असं संजय राऊत म्हणाले. “अजून काहीच सुरू झाले नाही, राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी लोक मृत्यू पडत आहेत. अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर पडलाय, राज्यपाल कुठे आहेत आता? घटनेचे पालन आता तरी राज्यपालांनी करावं, असं म्हणत संजय राऊत यांनी थेट राज्यपालांना प्रश्न विचारला आहे. तसेच, मंत्रालय ठप्प पडले आहे. शपथ घेऊन देखील कामकाज सुरू झाले नाही. मंत्री अजून का बनले नाही?”, असं संजय राऊत म्हणाले. संसदेत काही शब्दांवर बंदी घातली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “या शब्दांवर बंदी घालण्याची वेळ सरकारवर का आली? हे सर्व शब्द भविष्यात सरकारविरोधात वापरले जाऊ शकतात. या भीतीतून हे झालंय का? या देशातला भ्रष्टाचार संपूर्णपणे संपलाय का? विधीमंडळ, स्थानिक स्वराज्य, पालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तरी शब्द वापरायचा नाही? ही कुठली हुकूमशाही?