मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, माजी उप पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. त्यांनी मातोश्री निवासस्थानी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
मुख्यमंत्री आपल्या अभिवादन संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव साजरा करतो आहे. या संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आणला. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकारही म्हटले जाते. त्यांनी हा महाराष्ट्राचा मंगल कलश आपल्या सर्वांच्या हाती सुपूर्द केला आहे. त्यामुळे सर्वांगसुंदर, बलशाली आणि यशवंतराव यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याची जबाबदारीही आपल्याकडे आली आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी आपण एकजूटीने प्रयत्नशील राहूया.’