मुंबई (वृत्तसंस्था) आपली लेखणी समाजहितासाठी झिजवणारा आणि पत्रकारितेतील नव्या पिढीला बातमीदारीची ओळख करून देणारा निर्भीड पत्रकार गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, नार्वेकर यांनी माथाडी कामगार, गिरणी कामगार यांच्या प्रश्नांसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांबाबत आपल्या धारदार लेखणीतून वाचा फोडली. त्यांचे “मनातील माणसे” हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक प्रतिभाशाली ललित लेखकाचे दर्शन घडवते. साधी-सोपी भाषा आणि थेट वाचकांच्या मनाला स्पर्शणारी शैली हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्टय होते. एखाद्याला हवा असलेला संदर्भ सहजतेने उपलब्ध देणाऱ्या नार्वेकरांनी संपादक म्हणून अग्रलेख, प्रासंगिक स्फुट, स्तंभ लेख, व्यक्तीचित्र, स्मरणचित्र, राजकारण, भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर विपूल लेखन केले. त्यांनी जेष्ठांचे, सेवानिवृत्तांचे आयुष्य आनंददायी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या निधनामुळे आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा निर्भीड पत्रकार गमावला आहे. ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.