जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत माझे पती चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांचा ११ सप्टेंबर २०२० रोजी मृत्यू झाला. ५ आरोपींवर दीड महिन्यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झालेला असला तरी आरोपी अधिकारी आणि कर्मचारी फरार आहेत. हे आरोपी आता फिर्यादी, साक्षीदारांवर दबाव टाकून धमकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आज चिन्या जगताप यांच्या विधवा पत्नी मीनाबाई जगताप यांनी केलाय.
आपली भूमिका समाजापुढे मांडण्यासाठी आणि न्याय मिळावा म्हणून आज पत्रपरिषदेत मीनाबाई जगताप म्हणाल्या की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने संबंधित आरोपींवर दीड महिन्यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झालेला असला तरी तत्पूर्वी पोलीस काहीच दखल घेत नसल्याने मला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती. त्यानंतर तब्बल १४ महिन्यांनी हा खुनाचा गुन्हा नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यापासून हे ५ आरोपी फरार आहेत, असे पोलीस सांगत आहेत. सर्व आरोपी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. कामावर हजर नाहीत. तथापि कारागृह प्रशासनाकडूनपण त्यांच्यावर निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई झालेली नाही. जिल्हा पोलिसांना पण ते अजून सापडलेले नाहीत. एवढा प्रदीर्घ काळ त्यांचे फरार असणे आता जिल्हा पोलिसांच्या पण भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे. नेमके कोण त्यांना पाठीशी घालून संरक्षण देत आहे, हे सत्य समोर येणारच नाही का ?, असेही त्या म्हणाल्या.
मीनाबाई जगताप पुढे म्हणाल्या की, हे ५ आरोपी जळगाव परिसरातील काही लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांचे स्थानिक प्रशासनात परिचय, संबंध असू शकतात. या पार्शवभूमीवर चिन्या जगताप हत्याकांडातील साक्षीदार व सध्या नाशिकच्या किशोर सुधारालयात कारागृह शिपाई या पदावर कार्यरत असलेले मनोज जाधव यांनी जबाब नोंदविण्यास जळगावात येण्यास नकार दिल्याने किशोर सुधारालयाच्या प्राचार्यांनी तशी माहिती देणारे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पाठवले आहे. या हत्याकांडातील आरोपी असलेले अधिकारी आणि कर्मचारी दीड महिन्यांपासून फरार आहेत. आपल्या जीविताला येथे आल्यावर धोका होऊ शकतो अशी भीती साक्षीदार मनोज जाधव यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे. साक्षीदाराला भीती वाटावी असा कोणता मुद्दा आहे की जो आतापर्यंत जिल्हा पोलिसांना उलगडता आलेला नाही. काही पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत मला पण धमकावण्याचा प्रयत्न हे आरोपी करत आहेत. आरोपींना अटक करण्याचे सोडून या पोलीस कर्मचाऱ्यांना मला आणि साक्षीदाराला भीती वाटावी अशी भूमिका घेण्याचे आदेश कुणी दिले ? आम्ही आता न्याय मिळण्याची आशाच सोडून द्यायची का ? आरोपी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी असूनपण पोलीस आणि कारागृह खाते त्यांच्यावर काहीच कारवाई करणार नाही का ?. साध्या चोरीच्या किंवा हाणामारीच्या गुन्ह्यात समाजातील सामान्य घटक असलेल्या आरोपींना तत्परतेने शोधून अटक करणारे पोलीस खाते या आरोपींच्यासमोर लाचार झालेले आहे का ?, असेही त्या आज पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
मीनाबाई जगताप यांना रिपाइं (आठवले गट)चा पाठिंबा
फिर्यादी आणि चिन्या जगताप यांची विधवा पत्नी मीनाबाई जगताप यांचा एकाकी संघर्ष चालू आहे. या निराधार विधवा महिलेला कुणाची साथ नाही. पोलीस खात्याने आता त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. हे आरोपी कितीही पोहचलेले असले तरी कायद्याने त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सांगत आज या पत्रपरिषदेत मीनाबाई जगताप यांच्या संघर्षात आम्ही सोबत आहोत, अशा शब्दात रिपाइं (आठवले गट)चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पाठिंबा जाहीर केला. या आरोपींना अटक न झाल्यास प्रसंगी रिपाइं (आठवले गट) मयताची पत्नी मीनाबाई यांच्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करिन असा इशाराही त्यांनी आज दिला.