चोपडा (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपडा शहरासह जेथे गावठी कट्टे तयार केले जातात, अशा मध्य प्रदेश मधील पारउमर्टी गावात जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. गावठी कट्टे बनवू नका, कायदा हातात घेऊ नका, आपल्या मुलांचे आयुष्य खराब करू नका, त्यांना शिक्षण द्या. ऐवजी शेती करा, असे आवाहन ग्रामस्थांना केले. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा पाहणी दौरा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोपडा तालुका हा मध्य प्रदेश सीमेवर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्य प्रदेशातील बडवाणी येथील पोलिस दल आणि महाराष्ट्र पोलिस यांचा संयुक्त पाहणी दौरा झाला. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा पाहणी दौरा असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारच्या दौऱ्यात पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, बडवानी (म.प्र.) येथील जिल्हा पोलिस अधीक्षक पुनीत गहलोत यांच्या उपस्थितीत हा पाहणी दौरा झाला. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित या दौऱ्यात चोपडा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेवरील वैजापूर, उमर्टी, पार उमर्टी, सत्रासेन या गावातील सीमांची पाहणी करून पोलिसांनी विचारांची देवाणघेवाण केली. तसेच, नाकाबंदीसंदर्भात चर्चा केली.
दोन्ही जिल्ह्यातील हिटलिस्टवरील आरोपींची शहानिशा करून भविष्यात त्यांचाही बंदोबस्त करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर, पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोनि कावेरी कमलाकर, शहर पो.स्टे. चे पोनि सावळे, मध्य प्रदेशातील बडवानीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल पाटीदार, पोलिस उपअधीक्षक कमलसिंग चौहान, पोलिस निरीक्षक माधवसिंग ठाकूर यावेळी हजर होते.
उमर्टीतील गावठी कट्टयाबाबत कारवाई होणार !
उमर्टी येथून मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे विकले जातात. या मुद्द्याबाबत गंभीर दखल यावेळी घेण्यात आली. असे प्रकार मोडून काढण्याचे यावेळी ठरवण्यात आले. तसेच दोन्ही राज्यांतील पोलिसांनी आगामी काळात आपापसात सहकार्याची भूमिका घेत गैरकृत्यांना आळा कसा घालता येईल, याबाबतही चर्चा करण्यात आली. प्रारंभी येथील नगर परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सीमा भागातील गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी महसूल विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी आर.ओ. वाघ हे उपस्थित होते.
सरकारने मदत द्यावी, ग्रामस्थांची मागणी !
पोलिस अधिक्षक रेड्डी यांनी गावठी कट्टे विक्री होणाऱ्या पारउमर्टी गावात गेले. गावकन्याशी संवाद साधला. आमहाला सरकारने काहीतरी कायमची मदत करावी. आमच्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, तेव्हा आम्ही हे काम सोडून देऊ. अशी मागणी गावकन्यांनी केली. रेड्डी यांनी अगोदर वैजापूर मार्गे गेरुगाटी या गावाकडून पार उमटी या गावाला भेट दिली. जाताना चोपडा तालुक्यातील वैजापूर उमर्टी, सत्रासेन या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावांना भेटी दिल्यात, लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सतर्कता बाळगण्याचामत पोलिसांना सुचना दिल्या