चोपडा (प्रतिनिधी) सार्वजनिक शौचालयाची सफाई व देखभालीसाठी देण्यात आलेल्या ठेक्यात अनियमितता आढळून आली आहे. यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी यांना जबाबदार धरून स्वच्छता पर्यवेक्षक अतुल चौधरी यांची चौकशी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. तब्बल चार वर्षांनी ही चौकशी होणार आहे.
माजी नगरसेविका संध्या महाजन यांनी सोमवारी सकाळी शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आबा देशमुख, राजाराम पाटील, नरेश महाजन, प्रदीप शिरसाठ, प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते.
नगरपरिषदेतर्फे शहरात २५ ते ३० सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहेत. यापैकी ९ सेवा फाऊंडेशन या संस्थेमार्फत नव्याने बांधण्यात आले होते. या संस्थेलाच निविदेपेक्षा कमी दराने सफाई व देखभालसाठीचा ठेका देण्यात आला होता. यात अनियिमता झाल्याची तक्रार महाजन यांनी केली होती. दरम्यान, मागे काय झाले, या बाबतीत आता काहीही सांगता येणार नाही. या प्रकरणाबाबत आता काहीही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिली आहे.
















