चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील उमर्टी ते हातेड रोडवरील पाटचारीजवळ चोपडा ग्रामीण पोलीसांनी कारवाई करत दोन जणांकडून तब्बल ७ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतूस, दोन मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ३ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने शनिवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कळविले आहे.
चोपडा तालुक्यातील उमर्टी ते हातेड या रोडवर दोन संशयित आरोपी दुचाकीवरून अवैधपणे गावठी पिस्तुलांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता हातेड रोडवरील पाटचारी पुलावर सापळा रचला. त्यावेळी दुचाकीवर दोन जण आले, त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सागर शरणम रणसौरे वय २४ रा. पुणे आणि मनोज राजेंद्र खांडेकर वय २५ रा. कराड जि.सातारा अशी नावे सांगितली. त्यांच्या जवळून ७ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतूस, २ मोबाईल आढळून आले. या संदर्भात त्यांनी अधिक चौकशी केली असता या गुन्हेगारांवर पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात असलेल्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्नात आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.