टोकयो (वृत्तसंस्था) ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदकाची कमाई केली आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. भारतीय हॉकी संघाला ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली आहे. भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.
भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने ५-४ असा दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघाने आक्रमक खेळी केली. सामन्याच्या १५ व्या मिनिटाला जर्मनीने गोल केला आणि जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतरच १७ व्या मिनिटाला सिमरनजीतने गोल करत भारताला बरोबरीवर आणलं. त्यानंतर २४ व्या मिनिटाला जर्मनीच्या नेकलास वेलेनने गोल दागत २-१ असा स्कोर केला.
पुढच्याच मिनिटाला जर्मनीने आणखी एख गोल दागत ३-१ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर भारताच्या चिंता वाढल्या. पेनल्टी काॅर्नरचा पुरेपूर फायदा घेत हार्दिक सिंगने आणखी एक गोल करत भारताच्या आशा उंचावल्या. हाफ टाईमला केवळ काही सेकंद बाकी असताना हरमनप्रितने भारतासाठी आणखी एक गोल केला आणि सामना ३-३ अशा बरोबरीवर नेला.
दरम्यान, दुसऱ्या सत्रात रूपेंद्रपालने आणखी एक गोल करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. तर सिमरणजीतने आणखी एक शानदार गोल करत भारताला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने आणखी एक गोल दागत सामन्यात चुरस निर्माण केली. अखेरच्या क्षणापर्यंत झालेल्या सामन्यात भारताने अखेर विजय मिळवला आहे. तब्बल ४१ वर्षानंतर भारताला हाॅकीमध्ये पदक मिळालं आहे.