वरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यासह राज्य आणि इतर राज्यात विस्तार असलेली सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेत २०१३ मध्ये दाखल झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने बुधवारी येथील संचालकांच्या निवासस्थानांवर छापे टाकून सात संचालकांना अटक केली. इतर सर्व संचालक मात्र सुगावा लागताच पसार झाले. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
बुधवारी सकाळीच छापेमारी
बुधवारी सकाळीच बुलडाणा येथील पोलिस उपअधीक्षक अनिल पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल मदणे, पोलिस निरीक्षक शेळके, कुळकर्णी, नाफडे व अमरावती, वाशीम जिल्ह्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या २० जणांच्या पथकाने संचालकांच्या घरांवर छापेमारी करून धरपकड केली. त्यात २७ संचालकांपैकी चंद्रकांत बढे, राजेंद्र चौधरी, भागवत पाटील, बळिराम माळी, भिकू वंजारी, गोविंद मांडवगणे, विजय वाघ या सात संचालकांना वरणगाव पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यानंतर पथक त्यांना बुलडाण्याकडे घेऊन रवाना झाले. परंतू काहींना संचालकांना सुगावा लागल्यामुळे ते आधीच फरारी झालेत.
काय होता नेमका गुन्हा !
सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेचा राज्यभर कारभार असल्याने बुलडाणा येथेदेखील शाखा होती. शाखेत सात लाख रुपयांच्या घोळप्रकरणी पीतांबर चौधरी (रा. बुलडाणा) यांच्या फिर्यादीवरून २०१३ मध्ये पोलिसांत ठेवीदारांच्या ठेवी व त्यांचे हितसंबंधी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालांतराने विविध ठेवीदारांनी ठेवींसंदर्भात बुलडाणा पोलिसांत गुन्हे दाखल केल्याने ८० कोटींच्या वर आकडा समोर आल्याने त्यानंतर पोलिसांकडील तपास सीआयडी विभागाकडे वर्ग झाला होता. या पथकामध्ये उपविभागीय अधिकारी अनिल पवार, उपविभागीय अधिकारी यांचा समावेश आहे. संचालकांना ताब्यात घेतल्यापासून त्यांची आणि पतसंस्थांची कसून चौकशी सुरू आहे.
















