अमरावती (वृत्तसंस्था) काकाने दोन वर्षीय चिमुकल्या पुतण्याची पायाने तुडवून हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील पोहराबंदी येथे उघडकीस आली. अमित संजय भोयर (वय २, रा. पोहराबंदी) असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी पूजा संजय भोयर (वय २५ रा. पोहराबंदी) यांच्या तक्रारीवरून दीपक उर्फ बाल्या अजाबराव भोयर (वय ३२ रा. पोहराबंदी) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पूजा व संजय यांचे पाच ते सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. संजयसोबत नेहमी वाद होत असल्याने काही महिन्यांपूर्वी पूजा ही चिमुकल्या अमितसह माहेरी शिरपूरला निघून गेली होती. परंतु, बरेच दिवस लोटूनही संजय तिला घ्यायला गेला नाही. दरम्यान, दीपक हा वहिनी पूजा यांच्या माहेरी गेला. तो तिला आपल्यासोबत गावी पोहराबंदी येथे घेऊन आला. त्यानंतर ते दोघे सोबत राहू लागले. परंतु, दीपक हा चिमुकल्या अमितवरून पूजासोबत वाद घालत होता. अमितला त्याचे वडील संजयकडे सोडून देण्याची मागणी तो पूजाकडे करीत होता. याच कारणावरून एप्रिल महिन्यामध्ये दीपकने पूजासोबत वाद घालून तिच्यासह चिमुकल्या अमितला मारहाण केली होती.
याबाबत फ्रेजरपुरा ठाण्यात मारहाणीचा गुन्हादेखील दाखल झाला होता. त्यानंतर पूजा ही चिमुकल्या अमितसह पुन्हा माहेरी शिरपूरला निघून गेली. दरम्यान, ऑगस्ट महिन्यामध्ये दीपक पुन्हा पूजाकडे गेला. त्याने पूजाची माफी मागून पुन्हा असे करणार नाही, अशी ग्वाही दिली. मी तुझ्यावर प्रेम करतो, मुला चांगले ठेवेन, असे म्हणून तो तिला पोहराबंदी येथे घेऊन आला. ते दोघे सोबत राहू लागले.
काही दिवस चांगला राहिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी कामावरून घरी परतताच दीपकने पुन्हा अमितवरून पूजासोबत वाद घातला. त्यावेळी पूजा ही चिमुकल्या अमितला पाळण्यात झोके देऊन झोपवत होती. त्याने पूजाला शिवीगाळ करून मारहाणसुद्धा केली. त्याचवेळी अमितचा रडण्याचा आवाज आला. त्यावर दीपकने त्याला पाळण्यातून उचलून खाली फेकले. त्याला पायाने तुडविले. त्यात अमितचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यावर दीपकने याबाबत कुणाला काहीही न सांगण्यासाठी पूजाला धमकी दिली. दीपक हा चिमुकल्या अमितला घेऊन गावातून जात होता. पूजाही त्याच्या मागेमागे होती. याबाबत पोलीस पाटील यांच्यासह गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या दोघांना थांबविले. त्यानंतर याबाबत फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तातडीने पोहराबंदी गाठून चिमुकल्या अमितला इर्विन रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे पोलिसांनी पूजासह दीपकची कसून चौकशी केली. यावेळी पूजाने सदर घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीकरणार दीपकविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ दैनिकाने दिले आहे.