जळगाव (प्रतिनिधी) येथील आदर्श नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून १ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल शिरीष भंडारी (वय-३७) रा. उज्ज्वल स्कूल जवळ, आदर्श नगर जळगाव हे कुटुंबियासह राहतात. हर्षल भंडारी हे अमळनेर येथील मुळे रहिवाशी आहे. त्यांच्या घरी कानुबाईचा कार्यक्रम असल्यामुळे भंडारी हे आपल्या कुटुंबियांसह शनिवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून अमळनेरला निघून गेले. दरम्यान आज सोमवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणारे राजेंद्र पाटील यांनी हर्षल भंडारी यांना घरात चोरी झाल्याचे फोनद्वारे कळविले. घरात चोरी झाल्याचे समजताच भंडारी कुटुंबिय घरी पोहचले. यात घरातील सामान अस्तव्यस्त केलेले दिसून आले. यात कपाटात ठेवलेले १ लाख ३९ हजार ५०० रूपयांची रोकड, १३ हजार रूपये किंमतीची ११ ग्रॅम सोन्याची मंगलपोत, ७ हजार २०० रूपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, १५ हजार रूपये किंमतीच्या सोन्या लहान मोठ्या सोन्याच्या अंगठ्या आणि ८ हजार रूपये किंमतीचा डायमंड नेकलेस असा एकुण १ लाख ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी हर्षल भंडारी यांनी आज रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.