धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी. आर.हायस्कूलमधील राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) नऊ विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ या वर्षासाठीची मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झाली असून या शिष्यवृत्तीचे वितरण १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, जळगावचे कमांडींग ऑफिसर कर्नल प्रवीण धीमन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय छात्रसेनेच्या अमरावती ग्रुप मधून सीनिअर व ज्युनिअर डिविजन मधून २४ कडेट्सना ही शिष्यवृत्ती जाहीर झाली असून त्यापैकी जळगाव जिल्ह्यात १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या कार्यक्षेत्रात सिनियर डिव्हीजन मधून २ आणि ज्युनियर डिव्हीजन मधून १६ अशा १८ विद्यार्थ्यांना ही मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झालेली आहे. ज्युनिअर डिव्हिजन मधून १६ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती जाहीर झाली असून धरणगावच्या पी.आर.हायस्कूलच्या नऊ कॅसेट्सना हा सन्मान जाहीर झाला आहे. दरवर्षी मुख्यमंत्री शिष्यवृत्ती मिळवण्याचा बहुमान पी.आर.हायस्कूलने कायम ठेवला आहे. जयविर पाटील, निखिल महाजन, जयेश महाजन, ऋषिकेश जनकवार, वैशाली रावतोळे, दिपिक्षा महाजन, डिंपल सोनार, दीपा सुतारे, पल्लवी सोनवणे या नऊ कॅडेट्सची राष्ट्रीय छात्र सेनेत प्रतिष्ठेच्या असलेल्या शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे. छात्रसेनेतील गुणवत्ता, शालेय गुणवत्ता, खेळ, समाज सेवा, सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमातील सहभाग, विविध स्पर्धा, साहसी कार्य, नेतृत्व गुण आदी गुणांचे मूल्यमापन करून ही निवड केली जाते.
या कॅडेट्सना पी. आर. हायस्कूलचे चिफ ऑफिसर डी.एस. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा पी.आर.हायस्कूल सोसायटी अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी,उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, संचालक अजय पगरिया, मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक रामचंद्र सपकाळे, पर्यवेक्षक डॉ. आशा सपकाळे यांच्या हस्ते या कॅडेट्सचा सन्मान करण्यात आला. यावेळी बापू शिरसाठ, धनराज चौधरी, कैलास वाघ, माकांत बोरसे, गणेश सिंह सुर्यवंशी, प्रदीप असोदेकर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.















