मुंबई (वृत्तसंस्था) नर्सेसच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदांपैकी ५०% (८५००) पदे भरण्याची अनुमती दिली आहे. आगामी कालावधीत ही पदे भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.
एका वेबिनारमध्ये आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. या वेळी नर्सिंग संवर्गातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रूपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केल्या. राज्यातील गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावे यासाठी धोरण तयार करण्यात येत आहे. कुणालाही रक्तासाठी रक्कम मोजावी लागणार नाही यासाठी निर्णय विचाराधीन असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. पुढील आठवड्यात ५०० नवीन रुग्णवाहिका दाखल होतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.